मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
सुशांतसिंग राजपूत ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात मंगळवारी जामीन अर्ज केला.
एनसीबी ने रियाला ९ सप्टेंबर रोजी अटक केली. विशेष एनडीपीएस न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने मंगळवारी तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.
अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.
"अमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते", असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला आहे.
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया मुख्य आरोपी आहे. रिया आणि अन्य आरोपींनी भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले व्हॉट्सअॅप संदेश ईडीने प्राप्त केले. त्या संपर्कातून रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली.
रिया व शौकीक यांच्या जामीन अर्जावरील सूनवणी ही न्या. कोतवाल यांच्यापुढे बुधवारी होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment